करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा लेबर सोसायटीची निवडणूक मोठ्या चुरशीने होण्याचे चिन्ह आहे. या निवडणुकीत सहकार विकास पॅनलचा जोरदार प्रचार सुरु आहे. या पॅनलचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. रविवारी (ता. १८) या निवडणुकीसाठी सोलापुरात मतदान होणार आहे. फेडरेशनची १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यापैकी चार तालुके व आरक्षणाच्या चार जागांसाठी निवडणूक लागली आहे.
सहकार विकास पॅनलकडून इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात वसंत क्षीरसागर, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी गटात लक्ष्मण मस्के, महिला प्रतिनिधी गटात पार्वती गाडे व सरस्वती साठे हे उमेदवार आहेत. पंढरपूर तालुका बाळासाहेब बागल, माढा तालुका यशवंत शिंदे, सांगोला मतदार संघात बाबासाहेब करांडे व माळशिरस तालुका मतदार संघात अरुण थिटे हे उमेदवार आहेत. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात सदानंद फुले व वसंत क्षीरसागर, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी गटात रमेश वाघमारे व लक्ष्मण मस्के, महिला प्रतिनिधी गटातपूनम कोलगे पाटील, पार्वती गाडे, रेश्मा साठे व सरस्वती साठे यांच्यात लढत होत आहे.
या निवडणुकीत करमाळा मतदार संघात आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मानसिंग खंडागळे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय सोलापूर शहर मतदार संघात चंद्रकांत अवताडे, शंकर चौगुले, उत्तर सोलापूर मतदार संघात राजेंद्र सुपाते, दक्षिण सोलापूर मतदार संघात मुझमिल शेख, अक्कलकोट तालुका मतदार संघात रोहिदास राठोड, मोहोळ तालुका मतदार संघात शिवाजी चव्हाण, मंगळवेढा तालुका मतदार संघात शाम पवार व भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात संजय साळूंके हे बिनविरोध झाले आहेत.