करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या कामाचा विषय चव्हाट्यावर आल्यानंतर यामध्ये अनेकांनी लक्ष घातले आहे. प्रहारने हा विषय गांभीर्याने घेतला असून यामध्ये संबंधित कर्मचारी तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या विषयाची पुराव्यासह सर्व माहिती आमदार बच्चू कडू यांना देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना निवेदन दिले आहे, अशी माहिती प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी दिली आहे.
तळेकर म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक कुटुंब लक्षपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र करमाळा पंचायत समितीमध्ये काही कर्मचारी मनमानी कारभार करून लाभार्थ्यांची अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण विभाग बदनाम होत असून त्याची त्वरित चौकशी करून त्याला निलंबित करावे.’
सध्या पावसाळा लांबला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. मात्र सरकारच्या नियमांचा चुकीचा अर्थ काढून करमाळा पंचायत समितीमधील कर्मचारी अडवणूक करत आहे. त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले आहेत. करमाळ्यातील रोजगार हमीच्या कामाबाबत माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनीही मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
प्रहारचे तालुकाध्यक्ष तळेकर म्हणाले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. मात्र त्यांची अडवणूक केली जात असेल तर प्रहार रस्त्यावर उतरेल. बिटरगाव श्री येथील तक्रार आल्यानंतर करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी स्थळ पाहणीही केली. मात्र संबंधित अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्या कर्मचाऱ्याबाबत प्रहारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना माहिती देण्यात आली आहे. ते स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी प्रहारचे विकी मोरे, पप्पू ढवळे, अमित जगते, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.