करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र्च्या शाखेने कर्ज वसुलीसाठी एजेंट नेमले असून त्यांनी नागरिकांना त्रास देणे सुरु केले आहे. सध्या पाऊस नसल्याने कर्जदार अडचणीत आहेत. त्यातच महाराष्ट्र बँकेने कर्ज वसुलीसाठी मानसिक त्रास देणे सुरु केले आहे. याचा बळीराजा शेतकरी संघटनेने निषेध करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे गोवर्धन चवरे यांनीही बँकेच्या वसुलीच्या कारभाराबाबत सोलापुरात आंदोलन केले होते. त्यानंतर करमाळ्यात सुरु केलेल्या मोहिमेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर म्हणाले, कोरोनापासून छोटे व्यवसायिक अडचणीत आहेत. मोदी सरकारने मुद्रा योजना सुरु करत छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यातून अनेक छोट्या व्यवसायिकांना कर्ज मिळाले. मराठा व्यवसायिकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरु केले. त्यातून काही व्यवसायिकांना कर्ज मिळाले. तर अनेक व्यवसायिक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच महाराष्ट्र बँकेने मुजोरी सुरु केली असून वसुलीसाठी एजेंट नेमले असून अनेकांना जप्तीच्या नोटीसा देऊन मानसिक त्रास देत धमकावण्याचा काम सुरु केले आहे. या नोटीसा त्वरित मागे घ्याव्यात अन्यथा बँकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा, सुपनवर यांनी दिला आहे.