करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व गेल्या वर्षातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना व रासपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
समाधानकारक पाऊस नसल्यामुळे यावर्षीचा खरीप हंगामा वाया गेला आहे. रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत आहेत मात्र पाऊस नसल्यामुळे ही पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी झालेल्या सतत पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाले होते तर काही शेतकऱ्यांना पैसे जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, पैसे जमा न जमा केल्यास करमाळा तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल घुमरे यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपअध्यक्ष दीपक शिंदे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे, अशोक लवगारे, कांतीलाल शिदे, राजेंद्र घुमरे यांच्या सह्या आहेत.