करमाळा (सोलापूर) : ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा सल्ला देण्यासाठीच मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाने पाच जणांची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती काय?’ असा प्रश्न बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी उपस्थित केला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला यंत्रणेअभावी ऊस उपलब्ध होत नसल्यामुळे कारखान्याचे गाळप बंद करण्याचा सल्ला डांगे यांनी दिला आहे. त्यावर गुळवे यांनी टीका केली आहे. आदिनाथ कारखाना सावंत यांना घ्यायचा असून कारखान्यात सावंत यांचे फोटो लावल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुळवे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा आजच्या बैठकीवरून सावंत व प्रशासकीय संचालक आणि सल्लागार समितीला लक्ष केले आहे.
निवडणुकीसाठी ‘आदिनाथ’ला ऊस घालता मग कारखाना चांगला चालवा म्हणून सहकार्य का नाही? म्हणत भावनिक होत गुटाळांचा नेत्यांवर निशाणा
गेल्या आठवड्यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर हरिदास डांगे, डॉ. वसंत पुंडे, धुळाभाऊ कोकरे, सुहास गलांडे व अच्युत तळेकर पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (ता. 13) सल्लागार म्हणून नेमलेले डांगे यांनी आदिनाथ कारखान्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना सल्लागार पद नाकारत डांगे यांनी कारखान्याला ऊस मिळत नसल्याने कारखाना चालून जास्त तोट्यात जात आहे. त्यामुळे आदिनाथ कारखाना बंद करून निवडणूक घ्यावी, असा सल्ला दिला.
‘आम्हाला आता सल्लागार नेमून काय उपयोग? असा प्रश्न करत ‘आदिनाथ’च्या पाचपैकी तिघांनी सल्लागारपद नाकारले
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्यानंतर डांगे, डॉ. पुंडे, प्रशासकीय सदस्य महेश चिवटे व इतरांनी एकत्र येत आदिनाथ बचाव समिती स्थापन केली आणि आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सोंग केले. मात्र काय झाले हे आपण सर्वजण पाहत आहोत. आदिनाथवरती मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या सोयीचे प्रशासक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची नेमणूक करून हवे ते निर्णय करून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे’.
पुढे बोलताना गुळवे म्हणाले, ‘प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी ठरल्याप्रमाणे आदिनाथला मदत मिळाली नसल्याचे मान्य केले आहे. यावरूनच सर्व प्रकार लक्षात येतो. कारखान्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने आणि कारखान्याला कोणीही ऊस देत नसल्याने कारखाना स्वतः प्रशासकांनी कसा बंद करायचा? म्हणून सल्लागार मंडळ नेमून सल्लागार मंडळात नेमलेल्या डांगे व इतर मंडळीमार्फत कारखाना बंद करायचा विषय पुढे आणला आहे. याचाच अर्थ प्रशासकीय मंडळाला कारखाना चालवता येत नाही म्हणून कारखाना बंद करण्याचे खापर दुसऱ्याच्या माती मारण्यासाठी प्रशासकीय मंडळांनी हे सल्लागार मंडळ नेमले आहे.’, असा आरोप त्यांनी केला आहे.
बारामती ॲग्रोने १५ वर्षांवरून 25 वर्षासाठी आदिनाथ भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रयत्न केला, असा आरोप बैठकीत केला आहे. मात्र असा आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील तेरणा कारखाना देखील 25 वर्षासाठीच भाडेतत्त्वावर घेतला आहे. सावंत यांनी तेरणा कारखाना 25 वर्षासाठी भाडे तत्त्वावर कसा घेतला? याचे उत्तर बारामती ॲग्रोवर टीका करणाऱ्यांनी आधी द्यावे.
–सुभाष गुळवे, उपाध्यक्ष बारामती ॲग्रो