करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे वाढदिवस साजरा करू न दिल्यामुळे मारहाण झाली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लहू नवनाथ फरतडे (रा. सातोली, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये विश्वास झुंबर सांगडे (रा. कंदर, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
सांगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १७ तारखेला रात्री अकरा वाजताच्या सुमारास आम्ही घरी झोपलेले असताना गावात कोणाचा तरी वाढदिवस साजरा केला जात होता. त्याचा मोठ्याने आवाज येत होता. तेव्हा त्यांना गोंधळ घालू नका आम्ही झोपलो आहोत, आम्हाला त्रास होत आहे असे फिर्यादीच्या वडिलांनी वाढदिवस साजरा करणाऱ्यांना सांगितले. दरम्यान आमचे नातेवाई गुन्हा दाखल झालेले फरतडे तेथे दारू पिऊन आला. त्याने वडिलांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर वडिलांना समजावून सांगून आम्ही घरी आलो. तेव्हा घराच्या पोर्चमध्ये असताना फरतडेनी लाकडाने मला मारहाण केली.