करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंदनलिका वितरण प्रणालीच्या कामाचे मंगळवारी (ता. ५) भूमिपूजन होणार आहे. या कामामुळे 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पाणी चोरीला लगाम बसणार आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता साडे- जेऊर रस्त्यावरील दहिगाव उपसा सिंचन योजना मुख्य कालवा लगत साखळी क्रमांक 15/500 येथे हे भूमिपूजन होणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत ही योजना येते.
आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना व आताही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातून तालुक्याचा विकास करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्यात विविध कामे केली जात आहेत. यापुढेही विकास कामे केली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसासिंचन योजनेवर असलेल्या गावांमध्ये पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे अनेकदा वादही होत होते. अनेक शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. मात्र बंडनलिकेचे काम झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना समान पाणी मिळणार असून पाण्याची बचतही होणार आहे.
योजनेविषयी थोडक्यात…
दहिगाव उपसा सिंचन योजना 1996 मध्ये मंजूर झाली. या योजनेची चारी आणि उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित होते. या क्षेत्राला लाभ मिळावा यासाठी आमदार शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली. 2020 पासून 2023 पर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे 109 कोटीची तरतूद यासाठी केल्यामुळे दहिगाव योजनेच्या 27 वितरिका, 99 उपवितरीका व 19 थेट विमचक यांची अपूर्ण असलेली कामे केली जाणार आहेत.
101.34 कोटी कामांची निविदा काढली असून याचे काम द इंडियन ह्युम पाईप कं लिमिटेड मुंबई या कंपनीला मिळाले आहे. या योजनेची अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर दहिगाव योजनेला मंजूर असलेल्या 1.81टीएमसी पैकी 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्याचा फायदा योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर गावांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
योजनेच्या लाभक्षेत्रातील गावे…
जेऊरवाडी, कुंभेज, खडकेवाडी, गुळसडी ,देवळाली, पांडे, अर्जुननगर, हिसरे, शेलगाव, फिसरे, सरपडोह, सौंदे, सालसे, आळसुंदे, साडे, वरकटणे, कोंढेज, जेऊर, शेलगाव वांगी, लव्हे, निंभोरे, घोटी, वरकुटे, भाळवणी.