करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुंभार वाड्यात एका बारा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कमलेश क्षीरसागर असे त्याचे नाव आहे. दोन वर्षापासून तो एका आजाराला झुंज देत होता. कमलेश हा हुशार आणि चुणचणीत मुलगा होता.
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यानी स्वतः आजार कशामुळे होतो? त्याच्यावर उपचार काय? पुढे काय होणार? हे सगळे युट्युबवरून डॉक्टरांकडून आत्मसात करून घेतले होते. तपासणीला गेल्यानंतर कर्करोगाबद्दल तो अर्धा- अर्धा तास गप्पा मारून डॉक्टरांना प्रश्न कररत. तो शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याही संपर्कात होता. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो चाहता होता. प्रत्येक कार्यक्रमाला वडिलांना घेऊन तो येत असे.
‘मी मोठा होणार, शाळा शिकणार’ असे तो नेहमी म्हणत. चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त तो शुभेच्छा देण्यासाठी आला होता. ८ मार्चला सकाळी नऊ वाजल्यापासून त्याची तब्येत ढासळली होती. सायंकाळी त्याने आपला प्राण सोडला. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. स्वतःला काय झाले आहे आणि पुढे काय होणार आहे याची संपूर्ण कल्पना असताना तो दोन वर्षापासून आई- वडिलांना, दोन बहिणींना धीर देत होता. दोन वर्षाच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीसह मानसिक आधार देण्यात आला होता.