करमाळा (सोलापूर) : तरुण व महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असून प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणी व स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्याला कायम प्राधान्य देणार आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माझा प्रभाग विकसित करण्यावर भर देणार आहे. व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांचेही प्रश्न मांडणार आहे, असे जगदीश अगरवाल यांनी सांगितले आहे.
जगदीश अगरवाल हे प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचे शिक्षण HSC & HMCT झाले आहे. माजी नगरसेवक ललित अगरवाल यांचे ते चिरंजीव आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचे आजोबा कै. लक्ष्मीनारायण अगरवाल यांनी करमाळ्यात जनसंघाची स्थापना केली होती. ‘करमाळा शहरातील प्रभाग क्र. ६ चा विकास करण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरलो असून नागरिकांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा’, असे आवाहन जगदीश अगरवाल यांनी केले आहे. ‘केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असल्याने निधी मिळवण्यासाठी अडचण येणार नाही, फक्त नागरिकांनी विजयी करावे’, असे ते म्हणत आहेत.
अगरवाल यांनी केशव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम केले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी रुग्णवाहिका दिली होती. टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी एक टँकर देखील उपलब्ध करून दिला आहे. रक्तदान शिबीर व वृक्षारोपण असे त्यांचे सामाजिक उपक्रम कायमस्वरूपी सुरु असतात. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतो. प्रभागात सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा मदतीचा हात असतो. ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या योजना मिळाव्यात यासाठी त्यांचे विविध उपक्रम सुरु असतात.
या कामांना प्राधान्य राहणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रभागातील अंतर्गत रस्ते, भुयारी गटार, स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृह, आरोग्य व पाणी पुरवठा अशी कामे करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय प्रभागात सर्वधर्मीयांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा मानस असून याबाबत देखील प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे, असे अगरवाल म्हणाले.
तरुणांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
प्रभागातील तरुणांसाठी रोजगार कसा उपलब्ध होईल आणि त्यांना उद्योग व व्यवसायात संधी कशा उपलब्ध होतील त्यावर भर देणार आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत त्याबाबत जनजागृती करून तरुणांचे प्रश्न सोडवले जातील. या प्रभागात तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली जाईल. त्यांच्या इच्छाआकांक्षा कशा उंचावतील हे पाहून त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध कशा होतील हे पाहून त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
महिलांसाठी काय केले जाणार
प्रभागातील सर्व महिलांसाठी गृहउद्योग निर्मितीसाठी सरकारच्या योजना राबविण्यावर भर देणार आहे. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार दिले जातील. प्रभागात स्वच्छ आणि कायम पाणी कसे मिळाले यावर काम केले जाईल. टंचाईच्या काळात पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला जाईल. महिलांचे सर्व प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याला प्राधान्य राहणार आहे, असे अगरवाल म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी काय?
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध केले जाईल. त्यांच्यासाठी सरकारच्या योजना मिळाव्यात म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. त्यांची ‘आधाराची काठी’ बनून काम केले जाईल. अनेकदा त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. मात्र त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून सरकार दरबारी पालिकेचे रुग्णालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या भागात खास ज्येष्ठांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात केलेले काम
कोरोनाने संपूर्ण जग ठप्प झाले होते. मात्र अशा स्थितीत नागरिकांना मदत केली. माझ्या प्रभागात जास्तीत जास्त मदत कशी मिळेल आणि त्यांना आधार कसा मिळेल हे हा प्रयत्न केला. नगरपालिका प्रशासन, पोलिस व नागरिक यांच्यात समनव्य ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यावर भर दिला. समाजसेवेची आवड असल्याने अनेक रुग्णांना मदत केली. ती अशीच मदत करत राहणार आहे, नागरिकांनी मतरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन अगरवाल यांनी केले आहे.
शैक्षणिक काम
स्पर्धेच्या युगात माझ्या प्रभागातील मुलांसाठी बालपणापासूनच चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रोत्साहन देणार आहे. नगरपालिकेच्या शाळेचा विकास करण्यासाठी आणि तेथे चांगले विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी विशेष लक्ष घालणार आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही त्यामुळे शिक्षणावर काम करणार आहे. प्रभाग हे कुटुंब समजून नागरिकांच्या मागणीनुसार काम केले जाणार आहे, असे अगरवाल म्हणाले आहेत.
सरकार असल्याने निधी उपलब्ध होणार
अगरवाल हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. ते म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दूरदृष्टी ठेऊन करमाळा शहराचा विकास व्हावा यासाठी भाजप नगरपालिका निवडणुकीत उतरले आहे. सत्ता आली तर विकास करण्यासाठी सहज निधी उपलब्ध होईल. आणि कामे चांगली करता येतील. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराची पाणी पुरवठा योजना, नगरपालिका इमारत, उद्यान, क्रीडांगण, स्वच्छता, सर्व महापुरुषांचे पुतळे, रस्ते, वीज, आरोग्य हे असे महत्वाचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून निधी मिळवणार आहोत.’
