करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या (मविआ) प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत व जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
कंत्राटी भरतीसंदर्भात सर्व आदेश तत्कालीन मविआ सरकारने काढले होते. असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) कंत्राटी नोकर भरती संदर्भात भाजपा विरोधात नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये रोष पसरत आहे. तत्कालीन सरकारने कंत्राटी भरतीचे हे सर्व आदेश महायुती सरकारने रद्द केले आहेत.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. या कंत्राटी भरतीच्या संदर्भात मविआ नेत्यांनी महायुती सरकारवर बदनामी करण्याचे कटकारस्थान केले आहे. याच विरोधात भाजपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, भैयाराज गोसावी, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपचे दीपक चव्हाण, अमरजित साळुंखे, शशिकांत पवार, सुहास घोलप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.