सोलापूर : जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी केलेला 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा सरकारला त्वरित सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, नगररचना सहायक कल्याण जाधव, भूसंपादन अधिकारी अभिजीत पाटील, मंद्रूप तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आवश्यक असलेली जमीन भूसंपादित करण्यासाठी कार्यवाही करावी. या विकास आराखड्यात किती जमीन आवश्यक आहे, तसेच त्यासाठी किती शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करावी लागेल व त्यासाठी द्यावा लागणारा मावेजा याबाबतचाही निधी आराखड्यात प्रस्तावित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
173 कोटीचा तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा सादर करत असताना यामुळे या भागात किती रोजगार निर्मिती होईल त्याचेही सर्वेक्षण करावे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. तसेच सरकारला प्रस्ताव सादर करत असताना प्रत्येक विभागाला किती निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्याचाही स्वतंत्रपणे उल्लेख करावा व संपूर्ण प्रस्ताव एकत्रित करून त्वरित सादर करावा, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल विकास आराखड्याची माहिती दिली. कुडल संगम हे सोलापूर शहरा जवळील प्रमुख ऐतिहासिक महत्त्व असलेले एक अतिशय लोकप्रिय तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी भीमा आणि सीना या दोन नद्यांचे संगम होतो. जिल्ह्यातील अनेक सुंदर प्राचीन मंदिरापैकी कूडल येथील श्री संगमेश्वर आणि श्री हरीहरेश्वर मंदिर पाहण्याजोगे असून हे ठिकाण राज्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पूर्वीची 6 एकर जमीन असून नवीन 7.14 एकर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे. शेजारील आठ शेतकऱ्यांची ही जमीन असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देय राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सर्व कामांची माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राज्य वीज वितरण कंपनी, भूसंपादन, महसूल, पोलिस, पुनर्वसन या विभागाच्या कामाची माहिती देऊन जल पर्यटन, लाईट अँड साऊंड शो, उद्यान विकास, वृक्ष लागवड, चिल्ड्रन पार्क या सर्व कामांची माहितीही त्यांनी दिली. या सर्व कामासाठी 173 कोटी 22 लाख 67 हजार 526 रुपये इतक्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.