करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर करमाळा तालुक्यातील २२ गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लागावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी जनआंदोलन उभा केले होते. त्यातून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. सर्व नेत्यांशी त्यांची सकारात्मक चर्चा झाली होती. आज (सोमवारी) फडणवीस यांच्याशी त्यांची बैठक झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, मोहिते पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह बागल गट व जगताप गटासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हे आंदोलन उभा केले होते. संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सिंचनासंदर्भातील व्यथा मांडल्या. या मागण्यांसाठी 22 गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ‘आपण स्वत: या प्रश्नात लक्ष घालू आणि तो मार्गी लावू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मात्र निवडणूक लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असतो आणि मतदान हा तर आपला मुलभूत अधिकार आहे, असे सांगत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बहिष्कार मागे घेत असल्याचे या गावकर्यांनी सांगितले.
यापैकी काही गावातील सरपंच व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, गणेश कराड यावेळी उपस्थित होते. भाजपचे दीपक चव्हाण, सुहास घोलप, श्री. घोरपडे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. त्यांचेही आंदोलनकर्त्यांनी आभार मानले आहेत. फडणवीस यांच्याशी सोलापुरात झालेल्या बैठकीनंतर रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीने करमाळ्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा यासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभारही मानले असून हा विषय मार्गी लागला नाही तर विधानसभेला पुन्हा बहिष्काराचे शस्र काढले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.