करमाळा (अशोक मुरुमकर) : जेऊर वीज उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता (वर्ग 2) लाच मागणी केल्या प्रकरणात आज (सोमवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. त्यांनी शेतीच्या कनेक्शनसाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले होते. दरम्यान ही कारवाई झाली आहे. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिग्विजय आबासाहेब जाधव असे संशयित आरोपी सहाय्यक अभियंता यांचे नाव आहे.
त्यांनी तक्रारदाराकडे ‘आईच्या नावे असलेल्या शेत जमिनीमध्ये शेती पंपाचे विद्युत कनेक्शन मिळवण्यासाठी जेऊर वीज महावितरण कार्यालयाकडे अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याचा पाठपुरावा ते करत होते. मात्र शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन करिता महावितरण कार्यालयाचे विद्युत पोल उभारणी करून विद्युत कनेक्शन देण्याकरिता संशयित जाधव यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये उमाकांत महाडिक पोलिस निरीक्षक एसीबी, पोलिस आमदार शिरीष सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे.