करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथे बसवण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे प्रशासन व नागरीक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पुतळा हटवण्याबाबत प्रशासनाने नोटीस जारी केल्यानंतर नागरिक एकवटले आहेत. अनेक ठिकाणाहून शिवभक्त येऊन शेटफळकरांना पाठिंबा देत आहेत. हा पुतळा हटवू नये, या मागणीवर शिवभक्त ठाम आहेत. ऐनवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येथे पोलिस बंदोबस्तही तैनात आहे.
अनेक ठिकाणावरून शिवभक्त येऊन येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा पुतळा हटवू नये, असा निर्धार केला जात आहे. शेटफळ येथे २० वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा होता. मात्र हा पुतळा खराब झाल्याने आहे त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवला. याची माहिती पसरतात प्रशासनाने हा पुतळा झाकून ठेवावा किंवा हटवावा, अशी मागणी केली. या पुतळ्याला सरकारने कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे हा पुतळा हटवण्याची मागणी केली जात आहे. मात्र शिवभक्तांमध्ये हा पुतळा हटवल्यास मोठा उद्रेक होईल असे सध्याचे चित्र आहे. येथे शेटफळमधील व विविध ठिकाणावरून रोज शेकडो तरुण उपस्थित असतात. हा पुतळा हटू नये अशी भावना सर्व शिवभक्तांची आहे.