महाराष्ट्र सरकारने राज्यातील शहरी व ग्रामीण सुशिक्षित युवकांची वाढती संख्या, उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाची महत्वाकांक्षी योजना २०१९- २० पासून राज्यात सुरू केली आहे. जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
सदर योजना कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी आहेत. या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा ४५ वर्ष, (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त जाती व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांच्यासाठी ५ वर्षे शिथिल) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे १० लाखांवरील प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण व २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० वी उत्तीर्ण अशी आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे.)
या योजनेत अर्जदारांना उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रीकेशन इ.) ५० लाखपर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा उद्योग व्यवसायासाठी (उदा. सलून, रिपेरिंग व्यवसाय, ब्युटी पार्लर इ.) रू. २० लाखापर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक/ इतर मागास प्रवर्ग/ विमुक्त जाती व भटक्या जमाती/ अल्पसंख्याक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरित सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थ्यांना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करताना अर्जदारास स्वतः चा फोटो आधार कार्ड, अधिवास दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाइटवरुन डाऊनलोड करुन पूर्ण भरलेले हमीपत्र (Undertaking Form) ही कागदपत्रे Upload करावी लागतात.
तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांनी वरील प्रमाणे संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र / खादी व ग्रामोद्योग मंडळ, होटगी रोड, किनारा हॉटेल समोर, सोलापूर येथे कार्यालयीन कामाचे दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच सदर योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तिची नेमणूक केलेली नाही व सदर योजनेचा लाभ घेण्यात आपली खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अर्जदारांनी सदर योजनेत भाग घ्यावा, असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर दूरध्वनी क्रमांक ०२१७- २६०५२३२ असून ई मेल आयडी didic.solapur@maharashtra.gov.in असा आहे.
(संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर)