करमाळा (सोलापूर) : ‘बांधावर नारळ लागवड हा उपक्रम खूप चांगला असून पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. बिटरगाव श्री येथे राज्य सरकारचा १५० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून ‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमाला आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली.

तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी अमर अडसूळ, मंडल अधिकारी श्री. बनसोडे, करमाळा पंचायत समितीचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी हनुमंत राजपूत, तांत्रिक सहायक शिवकुमार यादव, सहायक कृषि अधिकारी दादासाहेब नवले, पोलिस पाटील शोभा अभिमन्यू, पत्रकार अशोक मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, गजेंद्र बोराडे, माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, दौलत वाघमोडे, बबनराव मुरूमकर, भूषण अभिमन्यू आदी उपस्थित होते.

‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ उपक्रमासाठी करमाळा तालुक्यात वडगाव व बिटरगाव श्री या गावांची निवड झाली आहे. यामध्ये गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बांधावर नारळ लागवडीसाठी प्रोत्सहीत करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायत निवड करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस असेल तिथे अल्पभूधारक पात्र शेतकरी यांच्या बांधावर नारळ लागवड कार्यक्रम सुरु आहे.

बिटरगाव श्री येथे सीआरए (Climate-Resilient Agriculture) तंत्रज्ञान वापरून नारळ लागवड शुभारंभ झाला. सीआरए तंत्रज्ञान म्हणजे हवामान अनुकूल शेती. हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. विशेषतः कमी पाण्यात आणि पाण्याच्या उपलब्धतेत घट झाल्यास पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांची जोपासना करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे.

