सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ पार्श्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले.
यावेळी यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक राहिलेले निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर यांनी आषाढी वारी कालावधीमध्ये क्षेत्रीय स्तरावर व्यवस्थापनाची धुरा सांभाळणारे अधिकारी यांना घटना प्रतिसाद प्रणाली (IRS) आणि त्याद्वारे गर्दी नियोजनाशी निगडीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये गर्दी, चेंगराचेंगरी, त्याचे प्रकार, त्याचे रूपांतर मोठ्या आपत्तीमध्ये कसे होते, याची प्रक्रिया, अशा प्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे, त्याची शास्त्रीय पद्धती याबाबत प्रशिक्षण दिले. तसेच, यातून गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले तसेच नियुक्ती अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.
यावर्षी आषाढी यात्रा मुख्य सोहळा गुरुवार 29 जूनला होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यावर्षी किमान 16 ते 18 लाख भाविक आषाढी वारीस येतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमिवर वारकरी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, तसेच यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी अशाच प्रकारचे प्रशिक्षण आठवडाभरात आयोजित करण्यात येणार आहे.