सोलापूर : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील औषध तयार करणाऱ्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही याची दक्षता अन्न व औषध प्रशासन विभागाने घेऊन, वेळोवेळी कारखान्यांना भेट द्यावी. यासाठी अन्न औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ व पोलीस प्रशासन विभागाने संयुक्त पथकाची नेमणूक करून तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय नार्को को- ऑडीनेशन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. उमेश काकडे, केंद्रीय गुप्त वार्ता उपायुक्त किशोर कनकी, कस्टम विभाग अधीक्षक संजय कुमार, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सचिन कांबळे, अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब कांबळे, राज्य उत्पादन शुक्ल अधीक्षक नितीन कांबळे, विद्यापीठाचे कुलसचिव एसी.पी. सोनकांबळे, पोष्ट ऑफीस अधीक्षक आर.डी. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, श्वान पथक पोलीस उपनिरीक्षक.बी.बी.मस्के आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून कोणताही अंमली पदार्थ किंवा नशाकारक पदार्थाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासन विभागाने अंमल पदार्थांच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थांची वाहतूक व साठवणूक विक्री करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांची माहिती घेऊन अंमली पदार्थ तयार होत असतील अशा कंपन्यांवरही कारवाई करावी. जिल्ह्यात आगामी काळात सुरू होणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखान्याचे को-जनरेशन प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ तयार होणार नाहीत याबाबतची दक्षता राज्य उत्पादन शुल्क विभागाने घ्यावी. औद्योगिक विकास महामंडळाने नोंदणीकृत व सध्या बंद असलेल्या रासायनिक कंपन्यांची माहिती सादर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
जिल्ह्यात गांजा व खसखस पिकांची लागवड होणार नाही यासाठी कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवक यांची कृषी विभागाने नेमणूक करावी तसेच ग्रामीण भागात अंमली पदार्थांची लागवड करणे हा अपराध असून त्याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबतही प्रत्येक गावांत जनजागृती करावी. जिल्ह्यात वनक्षेत्र असलेल्या दुर्गम भागात वेळोवेळी भेटी देऊन अमली पदार्थांची लागवड होणार नाही याची दक्षता वन विभागाने घ्यावी. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांवर उपचार तसेच समुपदेशनातून जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच व्यसनमुक्ती केंद्राची यादी तयार करून व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाम बाबत चर्चासत्र व वादविवाद स्पर्धाचे आयोजन करावे. मोठ्या प्रमाणात आयात व निर्यात करणाऱ्या कंपन्यांना वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी. जिल्ह्यातील सर्वच विभागानेआपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाच्या दुष्परिणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.