Don react to any event respond Motivational expert Sonu Sharma advice to youngstersDon react to any event respond Motivational expert Sonu Sharma advice to youngsters

पुणे : आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे. तसेच तरुणांनी स्क्रीन टाईम कमी करण्याची आवश्यकता आहे. आपला काही वेळ त्यांनी कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी दिला पाहिजे आणि आपली कमिटमेंट पाळली पाहिजे.प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद क्षमता आहेत. पण आपण त्यांचा योग्य तितका, योग्य वेळी पुरेसा वापर करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घटनेला आपण प्रतिक्रिया’ देतो. त्याऐवजी आपण प्रतिसाद द्यायला शिकले पाहिजे. मग यश आपल्यापासून दूर नाही, असा मंत्र प्रख्यात मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांनी उपस्थितांना दिला. संवादी शैली, हलक्याफुलक्या विनोदाचा शिडकावा, सादरीकरणातील नाट्यमयता, विषयाचे नेमके भान आणि जाण अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे शर्मा यांचे कथन गर्दीने ओसंडून गेलेल्या सभागृहात विलक्षण परिणामकारक ठरले.

निमित्त होते, सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या द ब्रदरहूड फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोनू शर्मा यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बंतारा भवन, बाणेर येथे करण्यात आले होते. द फाउंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन, संस्थापक जयप्रकाश गोयल, ईश्‍वरचंद गोयल, सचिव रविकिरण अग्रवाल, सहसचिव नरेंद्र गोयल, कोषाध्यक्ष संजय अग्रवाल, समन्वयक कर्नल नरेश गोयल, मुकेश कनोडिया, संजय अग्रवाल तसेच पुणे जिल्ह्यातील विविध क्लब व संघटनांचे पदाधिकारी तसेच मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील सर्व अग्रवाल समाजाच्या क्लब व संधटनांना एकत्रित आणणे व अग्रवाल समाजाला एका माळेत जोडण्याच्या उद्देशाने या मार्गदर्शन सम्मेलनाचे आयोजन केले गेले होते.

सोनू शर्मा यांनी व्याख्यानाच्या सुरवातीलाच स्वत:च्या लौकिकार्थाने अपयशी कारकिर्दीची माहिती देत, उपस्थितांना आपलेसे केले. ‘आपल्याविषयी कुणी काहीही मत मांडले, तरी ते आपले वास्तव रूप असू शकत नाही,’ याची खूणगाठ स्वत:शी बांधा. फक्त अनुभव तुम्हाला यशापर्यंत नेत नाही. व्यवहारातला त्याचा नेमका वापर, तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतो. ‘ज्ञान ही शक्ती आहे’, असे म्हणताना, ते ज्ञान तुमच्या बँकखात्यात प्रत्यक्ष दिसले पाहिजे, अन्यथा ते नुसते एक वाक्य ठरते, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. ज्ञानाची अंमलबजावणी केली, तरच ती शक्ती ठरते. प्रत्येक व्यक्तीपाशी यशाच्या अनेक शक्यता असतात. क्षमता असतात. गरज असते ती त्या क्षमतांच्या विकासाच्या प्रक्रियेची. प्रक्रियेमुळे यशाची खात्री निर्माण करता येते. मात्र, प्रक्रिया सुरवातीला कष्टप्रद असते. ती प्रतीक्षा करायला लावते. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर अपेक्षित यशप्राप्ती खात्रीने मिळते. आपली सहनशक्ती, परिश्रमातील सातत्य ढळू देऊ नका, असे शर्मा म्हणाले.

बदल स्वीकारा : संधी मिळतील कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल सकारात्मक पद्धतीने आपलेसे करा, त्यांचा स्वीकार करा, तेच तुम्हाला नव्या यशाच्या अनेक संधी मिळवून देतील. जे बदलांना सामोरे जात नाहीत, ते स्पर्धेतूनच काय व्यवसायातून बाहेर फेकले जातात, हे विधान सोनू शर्मा यांनी जगभरातील अनेक ताजी उदाहरणे देत पटवून दिले. तुमच्या क्षेत्रात पुढच्या 10 ते 25 वर्षांच्या काळात काय घडू शकते, याचा विचार आधी करा. भविष्यवेधी राहिलात तर पुढच्या बदलांची चाहूल आधी लागून, अनुरूप बदल त्वरित करू शकाल. कारण कोणतीही बाजारपेठ सतत नवे, वेगळे, आकर्षक काही शोधत असते. त्या नवेपणाला प्रतिसाद द्या, यश तुमचेच आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. मन सामर्थ्यशाली, शरीर मनाचे ऐकते : आपले मन अतिशय सामर्थ्यशाली आहे. मनात जे सातत्याने सुरू असते, आपले शरीर, कृती त्यानुरूप घडतात किंवा बिघडतात. त्यामुळे मन कणखर, धाडसी करा. आपल्या चुका सतत उगाळत बसू नका. पुढचा विचार करा. आपल्या यशाकडे जाताना ‘देणारे’ व्हा, ‘घेणारे बनू नका’, असा सल्ला शर्मा यांनी दिला.

स्क्रीन टाईम कमी करा : तरुणाईसाठी संदेश देताना सोनू शर्मा म्हणाले,‘आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता आहेत. संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सगळ्यांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे. तसेच तरुणांनी स्क्रीन टाईम कमी करण्याची आवश्यकता आहे. आपला काही वेळ त्यांनी कुटुंबियांसाठी, नातेवाईकांसाठी दिला पाहिजे आणि आपली कमिटमेंट पाळली पाहिजे. कोविडकाळ एका वेगळ्या अर्थाने लाभदायक ठरला कारण जे तंत्रज्ञान येण्यासाठी किमान 15 वर्षे लागली असती, ते कोविडमुळे त्वरित प्रत्यक्षात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *