करमाळा (अशोक मुरूमकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करमाळा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा झाली. करमाळा शहरात मध्यरात्री विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळपासून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींची गर्दी झाली आहे. यावेळी प्रचंड उत्साह दिसून आला. यावर्षी करमाळा शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एकत्र जयंती साजरा केली जात असल्याने सर्वांचा एकोपा दिसून येत असून संपुर्ण परिसरात निळे वादळ असल्याचे दिसत आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बांधवानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यावर्षी एकत्र कार्यक्रम घेण्यात आले. व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, भीम गीते, निबंध स्पर्धा असे कार्यक्रम यामध्ये घेण्यात आले. आज सायंकाळी भव्य मिरवणूक असणार आहे. जयंतीनिमित्त गाडयांना व विविध ठिकाणी लावलेले मोठ- मोठे झेंडे विशेष आकर्षण दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘जय भीम’ लिहिलेली रिबीन, कागदी, कापडी, प्लास्टिक पताका, आकाश कंदील, सर्वांचे लक्ष वेधत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रस्ते, चौक ठिक-ठिकाणी झेंडे, पताका कमानी उभारल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये तसेच, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.
निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जयंती उत्सव समितीच्या मार्फत जाहीर करून बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांक : आयुष चैतन्य पाटील, द्वितीय क्रमांक : प्रणव भैलुमे, तृतीय क्रमांक : ॲड. रूपाली हिरवे, उत्तेजनार्थ : आदित्य अभिजीत कोरे, उत्तेजनार्थ : कावेरी विनायक खेडकर, जयश्री बाळासाहेब कांबळे, उत्कृष्ट लेखन : अंजली चंद्रशेखर वाघमारे, प्रवीण वसंत सरडे, सुलभा अनंतराव खुळे यांना बक्षीस देऊन जयंती उत्सव समितीतर्फे सन्मानित करण्यात आले. संयमी नागेश कांबळे या स्पर्धकांनी इंग्रजी लेखनातून अतिशय सुंदर व उत्कृष्ट लेखन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आम्ही त्यांचे विचार डोक्यात घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य करू असे स्पर्धक अंजली चंद्रशेखर वाघमारे यांनी म्हटले.