करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली, मात्र शेवटच्याक्षणी अतिशय नाट्यमय घडामोडीने रंगत आली आणि ३ वाजून ५ मिनिटाने या अंकावर पडदा पडला. शेवटपर्यंत या निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नव्हते. जगताप, शिंदे, पाटील, बागल व मोहिते पाटील यांच्या प्रतिष्टेची ही निवडणूक झाली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व गटाकडून प्रयत्न सुरु होते.
करमाळ्याच्या राजकारणात जगताप ‘किंग’! बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करणारा ‘मेकर’ कोण? ‘या’ सहा मुद्यांवर झाले काम
करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत शिंदे यांनी जगताप गटाला पाठींबा दिला होता. तर मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जगताप, पाटील व बागल यांच्यात समझोता झाला होता. सावंत गटाचे प्रमुख सुनील सावंत यांनी सोमवारीच अर्ज मागे घेतला होता. मात्र भाजप व अतुल खूपसे यांच्या समर्थकांचे शेवटपर्यंत अर्ज मागे आले नव्हते. त्यांनी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणूक बिनविरोध झाली आणि १८ जागेसाठी १८ अर्ज राहिले. त्यात जगताप गटाचे १३, पाटील गटाचे २, बागल गटाचे २ व सावंत गटाची १ जागा आहे.
करमाळा बाजार समिती बिनविरोध! ‘हे’ आहेत नुतन संचालक
काल (सोमवारी) दुपारी ३ वाजल्यानंतर राहिलेले अर्ज मागे घ्यावेत यासाठी जगताप, पाटील व बागल गटाकडून कार्यकर्त्यांना फोन जाण्यास सुरुवात झाली. पाटील, बागल व मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली पण भाजपचे उमेदवार मात्र वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत होते. अखेर वरिष्ठांशी बोलणे झाल्यावरच त्यांनी अर्ज मागे घेतले. यासाठी माजी आमदार जगताप व शंभूराजे जगताप हे सर्वांच्या संपर्कात होते. दरम्यान खूपसे हे दोन वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही वेळातच त्यांनी निर्णय बदलला.
Karmala APMC election करमाळा बाजार समितीचा उद्या फैसला, दिग्वीजय बागल यांच्यासह ८४ जणांचे अर्ज मागे
खूपसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज किती राहिले आहेत व कोणाचे आहेत याची तपासणी केली. तेव्हा जगताप गटाचे पवार, पाटील गटाचे देवानंद बागल, शिंदे गटाचे तानाजी झोळ, मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर व डॉ. अमोल घाडगे यांनी त्यांच्याशी वेगवेगळा संवाद साधला. यामध्ये त्यांना काही नेत्यांशी फोनवरही संवाद साधला. दरम्यान २.४५ वाजता ते तहसील कार्यालय आवारातून बाहेर पडले. तेव्हा पवार हे त्यांच्या गाडीत होते. तेव्हा ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सर्व व्यवस्थित होईल, असे सांगितले आणि निघून गेले.
काही वेळातच म्हणजे २.५६ वाजता शंभुराजे जगताप हे भाजपचे सुहास घोलप यांना स्वतःच्या गाडीत घेऊन आले. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण व सुहास ओहळ हे तेथे आले आणि अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे अर्ज मागे घेतले तरी खूपसे यांनी अर्ज मागे घेतले नाही तर निवडणूक लागणार हे निश्चित होते. त्यामुळे खूपसे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र २.५९ ला खूपसे यांचे उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आले आणि ३.५ वाजता निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बागल गटाचे धनंजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, सावंत गटाचे सुनील सावंत, पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील, देवानंद बागल व जगताप गटाचे शंभूराजे जगताप यांच्यात फोटो सेशनही झाले.