करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी दोन मतदारसंघात सहा अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही अर्ज आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून (सोमवार, ता. ४) सुरुवात झाली आहे. यामध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, रामदास गुंडगिरे, सागर दौड, जनार्दन नलावडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघात महादेव जाधव यांचा अर्ज दाखल झाला आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत. करमाळा तहसील कार्यालय परिसरात सहकारी संस्था निबंधक कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १८ जागांसाठी ही निवडणूक असून पहिल्यादिवशी ३५ अर्ज विक्री झाले आहेत.