करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्याची पातळी खाली गेली असल्याने टंचाई निर्माण होत असून तालुक्याच्या पूर्व भागातील घारगाव येथील सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा व जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली आहे.
सीना नदीपलीकडे असणाऱ्या घारगावला नेहमी पाण्याची टंचाई असते. या गावातील विहिर व बोरवेलची पाण्याची पातळी घटत चाललेली आहे. यावर्षी कसलाही पाऊस झाला नाही. गावातील नाले, तळे पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. गावामध्ये सध्या तुरळक ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, परंतु पेरणी झालेली पीके हाती लागतील की नाही याबाबत शेतकरी चिंतेत आहेत.
खरिपातील वाया गेलेल्या पिकांचा पिक विमा अजून मिळालेला नाही या भागात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादन करत आहेत. जनावरांना पशु पक्षांना चाऱ्याचा प्रश्न उद्भवलेला आहे, शेतकरी वाचवण्यासाठी शासनाने लवकरात लवकर छावण्या सुरू करण्यात याव्यात परिणामी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या भागातील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सरवदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.