करमाळा (अशोक मुरूमकर) : चिखलठाण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक चंद्रकांत सरडे यांचा खासदार शरद पवार यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे करमाळा तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीवेळी त्यांच्यात काही राजकीय चर्चा तर झाली नाही ना? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
चिखलठाण ग्रामपंचायत सरडे यांच्यासाठी प्रतिष्टेची होती. या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बागल व पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. शिंदे गटाचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड हे देखील सरडे यांच्याविरुद्ध होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस होती. मात्र मोठ्या मताधिक्याच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पवार यांची भेट घेतली आहे.
सरडे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत. करमाळा तालुक्याच्या राजकारणातील सरडे हे चर्चेतले नाव आहे. चिखलठाण ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना रोखण्यासाठी पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ‘या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अप्पासाहेब झांजुर्णे यांच्याबरोबर दिवाळीत पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी तालुक्यातील साखर कारखान्याची माहिती घेतली’, असे सरडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.