करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून आमदार संजयमामा शिंदे गटाच्या आठ इच्छुकांनी माघार घेतली आहे. करमाळा बाजार समितीत जगताप गटासाठी सध्या वातावरण चांगले आहे. आमदार शिंदे गटाच्या समर्थकांनी माघार घेतली असल्याने जगताप गटासाठी आणखी सोपा मार्ग झालेला आहे. मात्र सावंत गटाचे सुनील सावंत व चंद्रकांत सरडे यांचे अर्ज राहणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु आहे. त्यातील हमाल तोलार व व्यापारी मतदार संघातील तीन जागा बिनविरोध होणार आहेत. याची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या निवडणुकीत जगताप, पाटील, बागल व शिंदे गटाच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील यांच्यासह १६१ अर्ज दाखल झाले होते. त्यातील काही अर्ज नामंजूर झाले होते.
शिंदे गटाचे समर्थक सरडे यांनी यापूर्वीच माजी आमदार जगताप जो निर्णय घेतली तो मान्य असेल असे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना जाहीर केले होते. शिंदे गटाचा जगताप गटाला पाठींबा असेल असेही जाहीर करण्यात आले होते. आता शिंदे गटाच्या विलास पाटील, अमोल दुरंदे, सतीश शेळके, निलेश एकाड, आदिनाथ मोरे, आशिष गायकवाड, विलास फुंदे व सुजित बागल यांनी अर्ज मागे घेतले आहेत. २६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख असून आणखी राजकीय घडामोडी घडणार असून यामध्ये वेगळे चित्र दिसणार असल्याचे समजत आहे.