करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘बागल गटाला वामनराव बदे हे सोडून गेले तेव्हा गावात मी खंबीरपणे गट चालवला. गटाच्या नेत्यांनी माझी एक चूक दाखवावी, मी माघार घेईल. उमेदवारी देताना साधे विचारलं सुद्धा नाही मग जेथे काम करतो तेथेच आम्हाला किंमत नसेल तर कसं काम करायचे? असा प्रश्न करतानाच पारेवाडी ऊस उत्पादक गटातील बागल गटाचे बंडखोर उमेदवार गणेश चौधरी यांनी अजूनही माझा अर्ज ठेऊन दुसरा कोणताही अर्ज मागे घ्या, असे बागल गटाच्या प्रमुख नेत्यांना सूचित केले असून नाराजी व्यक्त केली आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. बागल गटाच्या संपर्क कार्यालयातही बरेच खलबते सुरु असल्याचे दिसत आहे. काही प्रमुख नेते आज उपस्थित आहेत. तर बागल विरोधी गटामध्ये हालचाली सुरु आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची मनधरणी सुरु असून अर्ज ठेवावेत म्हणून त्यांची समजूत काढली जात आहे. तर निकालाविरुद्ध न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी काही कायकर्ते मुंबईला गेले असल्याचीही माहिती मिळत आहे.
विरोधी गटाने सर्व उमेदवारांशी संवाद साधला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे यांनी सांगितले आहे. पारेवाडी ऊस उत्पादक गटात चौधरी यांनी बागल गटात बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे. याबाबत ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना ते म्हणाले, बागल गटाचा मी सच्चा कार्यकर्ता आहे. उमेदवारी देताना साधे आम्हाला विचारातही घेतले नाही. गावात मी पार्टीसाठी काम करत आहे. गावातील सर्वाना बरोबर घेऊन काम करत आहे. बदे यांनी पार्टी सोडल्यानंतर मी गट वाढवण्यासाठी काम केले.
‘या निवडणुकीत मला उमेदवारी मिळणे आवश्यक आहे. दाखल अर्जांपैकी कोणालाही माघार घेईला सांगावे. अर्ज मागे घेण्याबाबत गटातील कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. मात्र नेत्या रश्मी बागल किंवा नेते दिग्विजय बागल यांनी संपर्क साधला नसल्याचे’ही त्यांनी सांगितले आहे. प्रा. रामदास झोळ व मोहिते पाटील समर्थक सविताराजे राजेभोसले यांच्याबाबत विचारले असता बागल गटाने आमच्या मताचा आदर केला नाही तर पर्याय स्वीकारावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.