करमाळा (सोलापूर) : एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 420, 34 सह कॉपीराईट कायदा 1957 कलम 63 व 65 प्रमाणे करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील दुकानदारासह दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दिल्ली येथील कंपनीचे आनंद राधेश्याम प्रसाद (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दिनेश हुकुमचंद मुथा (रा. करमाळा) व योगेश फुलाणी (रा. गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयतांची नावे आहेत. यामध्ये तीन लाख 36 हजार 1 रुपयाची फसवणूक झाली असून यातील संबंधित बनावट रंगाचे डबे जप्त करण्यात आले आहेत. संबंधित रंग हा गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराने गुजरातमधून घेतला होता.
फिर्यादीत प्रसाद यांनी म्हटले आहे की, आमची कंपनी संपूर्ण देशात व्यवसाय करत आहे. कंपनीने स्वामीतत्त्वाचे मूळ अधिकार दिल्लीतील एका कंपनीला दिले आहेत. कंपनीच्या उत्पादनाची कोणीही विक्रेता नक्कल करेल अथवा नकली उत्पादने तयार करून आपल्या ताब्यामध्ये ठेवेल व नकली उत्पादनाची कब्जात ठेवून विक्री करेल अशा विक्रेत्यांवर स्थानिक पोलिसांच्या वतीने आम्ही कारवाई करतो. आम्हाला बनावट उत्पादन कसे ओळखायचे याबाबतचे प्रशिक्षण दिलेले आहे.
करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथे एका दुकानात बनावट साठा करून स्थानिक परिसरातील नागरिकांना विक्री होत असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली होती. त्यानंतर कंपनीने ही कारवाई केलेली आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मदतीने कंपनीने संबंधित दुकानावर छापा टाकला. तेव्हा तेथे बनावट रंगाचे डब्बे सापडले. या कारवाईमध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास रणदिवे, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, शिंदे हे उपस्थित होते.