करमाळा (अशोक मुरूमकर) : कोर्टी ते करमाळा रस्त्यावर विहाळ एसटी स्टॅन्डजवळ आज (बुधवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास उसाचा ट्रॅक्टर व पीकप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. पुणे (आळंदी) येथे विवाह सोहळ्यासाठी गेलेला पीकप गावी परतत असताना विहाळ येथे हा अपघात झाला आहे. अपघात झालेला पिकअप हा भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील आंबी येथील असल्याचे समजत आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच विहाळ व वीट येथील नागरिकांनी मदत केली.
करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिसही तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. टिळेकर, श्री. शेख व श्री. घोरपडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील पिकअप हा पुणेकडून भूमकडे जात होता. तर ऊसाचा ट्रॅक्टर करमाळ्याकडून कोर्टीकडे जात होता. त्यांच्यात समोरासमोर हा अपघात झाला आहे. लग्नासाठी पुण्याला गेलेल्या पीकपमध्ये १७ प्रवासी होते. त्यातील तिघांना गंभीर मार लागला असून इतर काहीजण जखमी झाले, असल्याचे प्रथमदर्शनी सांगत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की पीकपचा टप पूर्ण बाजूला झाला असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना रुग्णवाहिकेने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. करमाळा तालुक्यातील आज दिवसभरातील ही तिसरी घटना आहे. पांडे येथे सकाळी अपघात झाला त्यानंतर रेल्वेतून पडून एक ठार व विहाळचा अपघात ही तिसरी घटना आहे.