करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची पहाणी केली. सोलापूर व पुणे जिल्हा जोडणाऱ्या करमाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या डिकसळ येथील ब्रिटिशकालीन पुलालगतच्या पॅराफीटचा पूर्वेकडील काही भाग कोसळला आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
डिकसळ पुलाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी
माजी अध्यक्ष बागल म्हणाले, ‘अडीच वर्षांपासून मंजूर झालेल्या येथील पुलाचे काम पूर्ण करण्यात संबधितांना अपयश आले आहे. याची पुन्हा नव्याने निविदा काढण्याची गरज आहे. या भागातील हजारो नागरीकांचा शिक्षण, व्यवसाय, आरोग्य, रोजगारासाठी बारामती, भिगवण व पुणे येथे जावे लागते. येथील वाहतूक बंद झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. त्याचा विचार करत नवीन पुलाचे काम होईपर्यंत या पुलाची तात्पुरती डागडुजी करत हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करता येऊ शकते का? यासंबधी सबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. नवीन पुलाच्या कामासबंधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संबंधी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.