करमाळा (सोलापूर) : येथील महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश भोसले यांना सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचा ‘विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४’ मिळाला आहे. याबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांचा सन्मान केला.
पर्यवेक्षक भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले विशेष परिश्रम, विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेत सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने त्यांना आदर्श विज्ञान शिक्षक पूरस्कार दिला आहे. मंडळाच्या १२ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात आला.
या पुरस्कारामुळे महात्मा गांधी विद्यालयाच्या लौकिकात भर पडली असून माजी आमदार जगताप यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी संचालक दादासाहेब कोकरे, अमृत कटरिया, तालुका सोसायटीचे माजी संचालक भाऊसाहेब बुधवंत, अनिसचे माने भाऊसाहेब, दिगंबर रासकर आदी उपस्थित होते.