करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची आणि अतिशय चर्चेत असलेली रिटेवाडी उपसासिंचन योजना व्हावी यासाठी तालुक्यातून सर्वच स्तरातून प्रयत्न होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात याबाबत शब्द दिला होता. त्यानंतर आता माजी आमदार नारायण पाटील यांनी पंढरपुरात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन ही योजना पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते. यावेळी माजी आमदार नारायण पाटील हेही त्यांच्याबरोबर होते. त्यांनी रिटेवाडी उपसासिंचन योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. माजी आमदार पाटील ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, रिटेवाडी उपसासिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. हे काम मोठे आहे. २०१८ पासून मी या योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. या योजनेला नक्कीच यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, उजनी धरण भरल्यानंतर साधारण १०० टीएमसी पाणी खाली वाहून जाते. त्यामुळे ते वाया जाणारे पाणी रिटेवाडी उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून उचलण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. त्यासाठी रिटेवाडी उपसासिंचन योजनेचे काम होणे आवश्यक आहे. ही योजना झाली तर तालुक्यातील बहुतांश क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे या योजनेकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टी ठेवणे आवश्यक आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मोळी टाकण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला होता. तेव्हाही या योजनेचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. ही योजना व्हावी म्हणून तालुक्यातील प्रमुख गटाचे नेतेही प्रयत्न करत आहे. मात्र ही योजना कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.