करमाळा (सोलापूर) : जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, जेऊर व परिसरातील २० गावांच्या दळणवळणासाठी जेऊर बसस्थानक महत्वाचे आहे. अनेक वर्षापासून भौतिक सुविधांपासून ते वंचित होते. यामुळे या बसस्थानकाचे नुतणीकरण करावे, अशी मागणी आपण सरकारकडे केली होती. या मागणीस यश आले असून नुतणीकरणासाठी निधी मंजुर झाला आहे.
या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून राज्य परिवाहनचे पुणे प्रदेश कार्यकारी अभियंता यांचेकडून पुणे येथील अरिन डिजाइन यांना या कामाचे नकाशे तयार करणेबाबत सांगतिले आहे. आता नुतणीकरण लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यात तळमजला (300 चौमी) व पहिला मजला बांधकाम, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युतकाम, फायर फायटींग, पेव्हर ब्लाक पार्कींग, कुंपण भींत व गेट आदी कामांचा समावेश आहे. लवकरच हे काम पुर्ण व्हावे यासाठी आपला पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. करमाळा, कुर्डुवाडी व जेऊर बसस्थानकाचे नुतणीकरण करणार, असे माजी आमदार पाटील यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यातुन शब्द दिला होता. यापैकी करमाळा व कुर्डुवाडी बसस्थानक नुतणीकरण काम पुर्ण झाले.