करमाळा (सोलापूर) : तालुक्यात पोथरे व मांगी परिसरात बिबट्यासदृश प्राणी दिसला आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी. या भागाची उद्या (शनिवारी) सकाळी पहाणी केली जाणार आहे, असे वन विभागाचे वननिरीक्षक एस. आर. कुरुले यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. मांगी येथील प्रीतम माळी यांनी आज (शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बिबट्यासदृश्य प्राणी पाहिला आहे. हे दृश्य त्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल म्हणाले, मांगी व पोथरेच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला आंनद बागल यांच्या शेतात बिबट्यासदृश प्राणी दिसला. दोन दोन दिवसांपासून येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे. त्याने परवा जातेगाव येथील शिवाजी कामटे यांच्या शेतात शेळीवर हल्ला केला होता. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर गणपत जाधव यांनी या भागाची पहाणी केली होती. मात्र तेव्हा तरस असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर त्याने आणखी एका शेळीवर हल्ला केला होता. तेव्हा त्याने एक शेळी मारली पण तेथील माणसाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याला हुसकावले तेव्हा शेळी न खाता तो पळाला होता. आज माळी यांना उस लागवडीसाठी काढलेल्या सरीत बिबटया दिसला. त्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा वर घेऊन मोबाईलमध्ये त्याला कैद केले, असे बागल यांनी सांगितले आहे. प्रथमदर्शनी माळी यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान वनविभागाचे कुरुले म्हणाले, मांगी परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा व्हिडीओ देखील पाहिला आहे. मात्र अंधारात पहाणी करता येणार नाही. उद्या सकाळी येथील पहाणी केली जाणार आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. दोन दिवसांपूर्वी ज्यांनी पहाणी केली त्यापेक्षा आता काय आहे हे पहाणे महत्वाचे असणार आहे.