करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा करमाळा तालुक्यातील भीमा नदीवरील नव्याने होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन महिनाअखेर होणार आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी टाकळी येथे केले आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांसाठी ही अतिश महत्वाचे असून या पुलाचे काम झाल्यानंतर करमाळा येथून पुणे, बारामतीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
करमाळा तालुक्यातील टाकळी येथे जलजीवन योजनेचे भूमिपूजन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. तेव्हा बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, ऍड. अजित विघ्ने व सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांनी या भागातील विजेचा प्रश्न आमदार शिंदे यांच्यामुळे सुटला आहे. आता पुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावावे असे सूचित केले. विजेचा प्रश्न सोडवताना जिंती येथून कसा विरोध केला जात होता यावरही यावेळी भाष्य करण्यात आले. मात्र आमदार शिंदे यांनी कागदरचा दाखवलेला लोड आणि प्रत्यक्षात असलेला लोड हे अधिकाऱ्यांना पटवून दिले. बोगस ट्रान्सफार्म दिल्याने फक्त ठेकेदारांचा फायदा झाला मात्र वास्तविक शेतकऱ्यांना त्याचा त्रास झाला. आणि तो त्रास कमी करण्यासाठी आमदार शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे यावेळी सांगण्यात आले.
पुलाचा प्रश्न सुटल्यानंतर पुन्हा आमदार शिंदे हे २०२४ ला फिक्स आहेत. असे सांगण्यात आले. शेवटी आमदार शिंदे यांनी सुरुवातीच्या भाषणात ज्या मागण्या केल्या त्यावर उत्तर दिले. विकास ही सतत बदलणारी प्रक्रिया असते आणि बदलत्या काळात आवश्यक ती कामे केली पाहिजेत, असे सांगितले. त्यावर डिकसळ पुलासाठी आपण महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रयत्न केले. त्यामुळे निधी मिळाला. आता त्यासाठी ठेकेदार फायनल झाला आहे. प्रशासनाने त्याचे डिझाईन दिलेले असतानाही संबंधित ठेकेदाराने त्यांच्या पद्धतीने डिझाईन करण्यासाठी वेळ घेतला. त्यामुळे काम लांबले पण आता महिना अखेर या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पाण्यामुळे काम पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहे. हे काम चांगले आणि लवकर व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे हे काम होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जुन्या ब्रिटिशकालीन पुलासाठी महाविकास आघाडी सरकार असताना आपण निधीची मागणी केली होती. आताच्या सरकारकडेही आपली ती मागणी कायम आहे. आता पर्यटन विभागाकडून या पुलासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.