करमाळा (अशोक मुरूमकर) : शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागलेल्या श्री अंबालिका शुगरचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे. यावर्षी अंबालिका साखर कारखाना गाळप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता किती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र हा हप्ता जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित वर्ग केला जाणार आहे.
कर्जत तालुक्यातील श्री अंबालिका साखर कारखान्याला करमाळा तालुक्यातून मोठ्याप्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे. चांगला दर आणि वेळेवर पैसे अशी या कारखान्याची ओळख असून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला हा कारखाना आहे. कर्जत तालुक्याची कामधेनू असलेल्या अंबालिका साखर कारखान्याला २०२३- २४ या गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसासाठी पहिला हप्ता टनाला २ हजार ९०० रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे व जनरल मॅनेजर सुरेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अंबालिका कारखाना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ऊस दराच्याबाबत उच्चांकी दर देण्याची परंपरा या कायम ठेवली जाणार आहे, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला आहे. कारखाना दररोज १२ हजार मे टन क्षमतेने सुरु असून आज अखेर २. ७५ लाख मेटन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा १०.77 टक्के आहे. या कारखान्याने गळितामध्ये आघाडी घेतली असून १५ लाख मे टन गाळप करण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ऊस तोडणी यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे केन मॅनेजर विठ्ठल भोसले यांनी सांगितले आहे. पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.