करमाळा (सोलापूर) : स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना उत्तम शिक्षण व संस्काराची गरज आहे. हे लक्षात घेऊन भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने इंग्रजी माध्यम शिक्षण सुरु करण्यात आले आहे, असे भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी व्यक्त केले.
झरे येथे भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये ‘ग्रॅज्युएशन डे व पालकसभा’ झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जयप्रकाश बिले होते. प्रा. प्रदीप मोहिते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य बिले म्हणाले, केजी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी, असा तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमाचा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
प्रा. मोहिते म्हणाले, मुलांना स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर आतापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय मुलांना लागली पाहिजे. जयप्रकाश बिले यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय झाली. प्रा. मोहिते यांचा सेवानिवृत्तीबद्दल भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बिले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
ज्योती मुथा व सारिका चेंडगे मॅडम यांनी मुलांना वैदिक मॅथ व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती बिले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता साळुंके यांनी केले. मुख्याध्यापक दादासाहेब खराडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.