करमाळा (अशोक मुरूमकर) : समस्येतून कायमची मुक्तता हवी असेल तर चांगले विचार आवश्यक आहेत. मानवी जीवन हा विचाराचा पुतळा असून आनंदी आयुष्य जगण्यासाठी विचार महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन नानासाहेब साठे यांनी केले आहे.
मानसिक ताण- तणाव कमी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व पोलिस पाटील व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक टिळेकर, दळवी, चंदनशिवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी मानले.
साठे म्हणाले, ‘आहारावर नियंत्रण ठेऊन सर्व आजार रोखले जाऊ शकतात. आहार आणि विचार बदलला तर प्रत्येकजण शंभरी पार करेल. विचार बदलण्यासाठी मानसीक संतुलन आवश्यक आहे. जीवन जगताना अनेक इव्हेंट असतात. दुखःद आठवणी विसरा आणि स्वतःवर प्रेम करा. जेवढे तुम्ही लोकांसाठी काम कराल तेवढा आयुष्यात आनंद घेता येईल. चांगला विचार करा. मानवी जीवन हा विचाराचा पुतळा आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, असेही ते म्हणाले.