करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक टपाल सुविधा व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून माढा लोकसभा मतदारसंघात १३ गावात नवीन पोस्ट कार्यालय सुरू होणार आहेत. केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे नागरिकांना बँकिंग सेवा,पत्रव्यवहार, आधार कार्ड लिंकिंग, विमा योजना तसेच इतर शासकीय योजना गावाच्या दारातच उपलब्ध होणार आहेत.
करमाळा तालुक्यातील हिवरे व आळजापूर येथे तर सांगोला तालुक्यात वाणी चिंचोली व सोनलवाडी, माढा तालुक्यात गवळेवाडी, माळशिरस तालुक्यात मारकडवाडी, पंढरपूर तालुक्यात पिराची कुरोली व करोळे, माण तालुक्यात कारखेल, हिंगणी, जांभूळनी, ढाकणी व सोकासन या गावात पोस्ट कार्यालय सुरु होणार आहेत.
‘ग्रामीण भागातील नागरिकांना टपाल विभागाच्या सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांशी जोडून त्यांचा लाभ मिळवून देण्यास या पोस्ट ऑफिसेसचा मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिकांसह सर्व समाजघटकांना दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. माढा मतदारसंघातील नागरिकांसाठी या पोस्ट ऑफिसेस म्हणजे दिलासा देणारी बाब आहे. केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला’, असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले आहेत.