करमाळा (अशोक मुरूमकर) : सुपारी देऊन पतीने पत्नीची हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा पोलिसांना तपासात समोर आले आहे. ही सुपारी का दिली होती? हे मात्र अद्याप समजले नसून या प्रकरणात सहा संशयित आरोपींना अटक केली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथे मंगळवारी १६ जुलैला कोमल बिभीषण मत्रे या महिलेची हत्या झाली होती. ही हत्या कशामुळे झाली याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. या प्रकरणात सहा संशयित अटकेत आहेत. यामध्ये कोमलची आई आलकाबाई सौदागर वाघ (वय ४०, व्यवसाय शेती) यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी कोमल, तिचा मुलगा, सुन हे घरी असताना रात्री साडेआठच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती हातात कोयते घेऊन आले.
दरम्यान फिर्यादी व त्यांची हत्या झालेली मुलगी कोमल हे घरात कडी लावुन बसले. मात्र तेव्हा फिर्यादीचा मुलगा तानाजी व सुन शोभा हे या दुसऱ्या खोलीमध्ये बसले होते. मात्र अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला व त्यांच्या खोलीची बाहेरुन कडी लावून घेतली. त्यानंतर फिर्यादी व मृत्यू झालेली मुलगी असलेल्या खोलीच्या दरवाजाला धडका दिल्या. त्यात दरवाजाची कडी तुटल्याने दरवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केला व कोमलच्या डोक्यात मागुन कोयत्याने वार करत गंभीर जखमी करून तिची हत्या केली. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याकडे होता.
यातील संशयित आरोपी हत्या झालेल्या महिलेचा पती बिभीषण उर्फ पिन्या विलास मत्रे (वय २६, रा. पोंधवडी, ता. करमाळा) यानेच पत्नी कोमलची हत्या करण्यास सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. बिभीषण व कोमलचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. मात्र तीन वर्षांनी पत्नी माहेरी आली ती पुन्हा नांदण्यास गेलीच नाही. पती पत्नीच्या वडिलांना नांदण्यास का पाठवत नाहीत असे विचारून मारहाण करत होता. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायालयात आहे.
याप्रकरणात संशयित आरोपी पती बिभीषण मत्रे याला अटक करून पोलिसांनी तपास केला. तेव्हा संशयित आरोपी रोहन प्रदीप मोरे (वय २०, रा. जलालपूर, ता. कर्जत), सुनिल उर्फ काका विष्णू शिंदे (वय ३९), प्रदिप उर्फ दीपक सुनिल हिरभगत (वय ३२, दोघे. रा. भांबोरा, ता. कर्जत), विशाल उर्फ सोन्या परशुराम सवाणे (वय २३, मुळ रा. जाचकवस्ती, बारामती, ता. इंदापूर, सध्या रा. भांबोरा, ता. कर्जत) व ऋषीकेश उर्फ बच्चन अंनिल शिंदे (वय २२, रा. भांबोरा, ता. कर्जत) यांचा यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर, जालिदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलिस उपनिरीक्षक श्री. बनकर तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव टैंगल, सोमनाथ जगताप, तौफीक काझी. गणेश शिंदे, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी यांच्यासह मंगेश पवार, आप्पासाहेब लोहार, अझरूदीन शेख, बालाजी घोरपडे, श्री. डोंगरे, शेखर बागल, हनुमंत भराटे, समीर शेख, आनंद पवार, व्यंकटेश मोरे यांनी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले.