करमाळा (सोलापूर) : उजनीतून नियमबाह्य सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करावे व वरच्या धरणातून 10 टीएमसी पाणी तात्काळ उजनीत सोडावे अशी मागणी करत करमाळा, इंदापूर, कर्जत व दौंड तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना न्याय न मिळाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
उजनी धरणग्रस्तांची भिगवण येथे बैठक झाली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे. उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कॅनालमधून नियमबाह्य पाणी सोडण्यात येत आहे. ते पाणी तात्काळ बंद करावे, अन्यथा 1 फेब्रवारीला भिगवण येथे सागर हाॅटेल समोर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर यानी दिली आहे.
उजनीच्यावरील 19 धरणातील 10 टीएमसी पाणी उजनी धरणात तात्काळ सोडण्यात यावे. सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी तयार होत असलेली समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे, कालवा सल्लागार समितीत करमाळा तालुक्यातील दोन व इंदापूर तालुक्यातील दोन धरणग्रस्त प्रतिनिधींचा समावेश करावा असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी संचालक अजित रणदिवे, राजेंद्र धांडे, मकाईचे माजी संचालक नंदकुमार भोसले, केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारूद्र पाटील, इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णू देवकाते, करमाळा बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक दादा मोरे, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, संघर्ष समितीचे सदस्य महादेव नलवडे, सतीश राखुंडे आदी उपस्थित होते.