करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या विधानसभेत मराठा आमदारांची संख्या जास्त आहे. मात्र आतापर्यंत एकाही मराठा आमदाराने आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामा दिला नाही, हे दुर्दैव असल्याचे म्हणत हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सध्य परस्थितीवर भाष्य केले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काहीही केले जाते मग आरक्षणावर तोडगा का काढला जात नाही, असे परखड मत हभप पाटील यांनी कीर्तनात मांडले.
बिटरगाव श्री येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित पंचदिन किर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची किर्तन सेवाबुलढाणा येथील पुरुषोत्तम महाराज यांनी दिली. पुरुषोत्तम महाराज म्हणाले महाराष्ट्रात आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले आहे. धनगर व ओबीसी समाजही आरक्षणासाठी लढत आहे. सर्वांना आरक्षण देणे शक्य नसले तरी त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात नेत्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी केली आहे. यावर मार्ग काढला नाही तर घरातून बाहेर पडणेही अवघड होईल. सत्ता स्थापनेसाठी काहीही केले जाते मग समाजाच्या आरक्षणासाठी निर्णय का होत नाही? असा प्रश्न करत त्यांनी सरकारच्या कामकाजावरही मार्मिक पद्धतीने भाष्य केले. कीर्तन सेवेत त्यांनी सामाजिक विषयांना स्पर्श केला. आरक्षण नसल्याने तरुणांची परस्थिती वाईट होत आहे, याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. कीर्तन सेवेत त्यांनी धार्मिक व सामाजिक विषयांची सांगड घालत अतिशय उत्कृष्टपणे सेवा देत उपस्थितांची मने जिंकली.