करमाळा (सोलापूर) : कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट व इतर साहित्य करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निमगाव (ह) (करमाळा) व सोनारी (जि. धाराशिव) येथील बोट मालकाच्या बोटीद्वारे तीन परप्रांतीयांकडून हा उपसा सुरू होता. याबाबत पोलिस शिपाई सतिश एनगुले यांनी फिर्याद दिली आहे.
१५ जानेवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही कारवाई झाली. फैजुल माफीजुद्दीन शेख (वय २८, रा. गुहीटोला, पो. पलाशगच्छी, आंचल-उधवा, थाना राधानगर, ता. उत्तर पलाशगच्छी, जि. साहेबगंज, राज्य- झारखंड), असरफ असाराऊल शेख, (वय २१, रा. दरगांडगा, ता. उधुआ, जि. साहेबगंज, झारखंड), रबुल सजल शेख (वय २७, रा. बिकल टोला, प्लासगाछी, ता. उत्तर पलासगछी, जि. साहेबगंज, झारखंड) व बोटमालक अविनाश अभिमान हांगे (वय ३१, रा. सोनारी, ता. परांडा, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहित असताना महसुल विभागाचा परवाना नसताना कोळगाव धरणाच्या जलाशयातून बोटीने व सक्शन पाईपने वाळू काढून त्याचा साठा करून ती चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याचा दिसला आहे. याप्रकरणात करमाळा पोलिसांनी ३ लाखाची एक यांत्रीक बोट व इतर साहित्यासह ८० हजाराचा एक सक्शन पाइप, इतर सामुग्री व अंदाजे ४ ब्रास वाळू असा ४ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.