करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात कोर्टी व पांडे गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे पांडे गटात तर कोर्टी गटात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे वर्चस्व वाढत असताना दिसत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे हे शिलेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माढा मतदारसंघात हे दोघेही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा मानस व्यक्त करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. त्यात माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नसले तरी कोणीही उमेदवार दिला तरी त्याचा प्रचार करून त्याला करमाळा तालुक्यातून मताधिक्य जाईल असे चित्र आहे. करमाळा तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोने शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर दिला आहे. शिवाय वेळेत ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना मदत झाल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवाराला फायदा होणार आहे.
पांडे गटात तालुकाध्यक्ष वारे यांनी गावागावात पवार समर्थक तयार करून शरद पवार यांचे विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले आहेत. सामाजिक कामातही ते अग्रेसर असतात. कोरोना काळात केलेली मदत व काही गावात टॅंकरने केलेला पाणी पुरवठा यामुळे त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. पडत्या काळातही त्यांनी राष्ट्रवादीचे काम केले. या गटातही बारामती ऍग्रोने शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी मोठी मदत केलेली आहे.
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. करमाळा तालुक्यातील कारखाने बंद असताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही याची दक्षता गुळवे यांनी घेतली. डिकसळ पूल जड वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची अडचण होणार नाही म्हणून तत्काळ मार्ग काडून त्यांनी करमाळा तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून हाळगाव व शेटफळ गडे येथील कारखान्याने ऊस गाळप केला आहे. याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार आहे.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखाना बारामती ऍग्रोकडे जाणार होता मात्र काही अडचणीमुळे हा कारखाना भाडेतत्वावर त्यांच्याकडे गेला नाही. त्यानंतर त्यांनी हाळगाव येथील कारखाना घेतला आणि जामखेड तालुक्यासह करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी पर्याय दिला. ऊसाला चांगला दर आणि वेळेत ऊस गाळपाचे बिल यामुळे कारखान्याबाबत जनमानसात पवार यांची चांगली प्रतिमा झाली आहे.
संतोष वारे यांची पत्नी राणी वारे या जिल्हा परिषद सदस्या असताना त्यांनी या पांडे गटात अनेक विकास कामे केली. संतोष वारे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार निलेश लंके आदींच्या मार्गदर्शनाखाली कामे केली आहेत. करमाळा तहसील व पोलिस ठाण्यातील कोण काम घेऊन आले तर त्यांनी तत्काळ कामे करण्याला प्राधान्य दिले आहे. या निवणुकीत याचा किती फायदा होणार हे पहावे लागणार आहे. मात्र वारे यांनी याच कामांच्या जोरावर आपण शरद पवार यांची राष्ट्रवादी ज्याला उमेदवारी देईल, त्यांना मताधिक्य देणार असल्याचे सांगितले आहे.