करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बागल गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. करमाळा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न सुरू असून मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. त्यावर दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे आमदार देशमुख हे आज (रविवारी) करमाळा दौऱ्यावर आले होते. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच देशमुख हे करमाळा दौऱ्यावर आले होते. त्यांनी भाजपचे युवा नेते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. निवडणूक झाल्यानंतर बागल गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी तालुक्यात दौरे सुरू केले आहेत. रश्मी बागल यांना आमदार करण्याचा निश्चय कार्यकर्त्यानी केला आहे. त्यावरून पत्रकार परिषदेत आमदार देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘आमचे कार्यकर्ते पक्ष वाढवण्याचे काम करतील. पक्ष वाढला की ते उमेदवारीचा दावाही करतील’, बागल गटाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, लोकांच्या मनातला जो निर्णय आहे तो नक्की होईल’.