करमाळा (सोलापूर) : तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे विशेषबाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
यावर्षी उजनी मे महिन्याच्या प्रारंभीच उणे पातळीमध्ये गेल्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजना बंद पडली होती. या पावसाळ्यामध्ये 3 महिने उलटून गेले तरी अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे दहीगाव उपसासिंचन योजनेच्या पट्ट्यातील हंगामी पिकांबरोबरच केळी, ऊस यासारख्या बारमाही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे विशेषबाब म्हणून उजनी धरण अद्याप 33 टक्के भरलेले नसले तरीही दुष्काळी परिस्थितीचा विचार करता विशेष बाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.
उन्हाळ्यामध्ये उजनी धरण वजा 39 टक्के पातळीवरती गेले होते. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये ते वजा पातळीतून उपयुक्त 13 टक्के पातळीवरती आले आहे. धरण 33 टक्के भरल्यानंतर आवर्तन सुरू करण्याचा प्रघात आहे. परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती विचारात घेता विशेषबाब म्हणून दहिगाव योजनेचे आवर्तन सुरू होणे आवश्यक आहे. कारण या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावरती सौंदे, सरापडोह, शेलगाव क, साडे, निंभोरे, घोटी, गुळसडी, वरकटणे, कोंढेज आदी गावातील शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. याचा खर्च लाखोंच्या घरात अल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.