करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात साखर गैव्यहवार झाल्याचा आरोप करत तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा व साखर आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारखान्यावर येऊन चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे.
कारखान्यावर साखर नसताना साखर निर्यात केली. त्यात केंद्र सरकारचे तीन कोटी ३८ लाख ९२ हजाराचे अनुदान मिळवून गैरव्यहवार केला आहे. 2020- 21 मध्ये झालेल्या या प्रकरणाची चौकशी होऊन तत्कालीन दोषी संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी चिवटे यांनी केली होती. त्यांच्याकडून संबंधित रक्कम वसूल करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते. त्यानुसार सोलापूर येथील द्वितीय विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) बी. यू. भोसले यांनी 9 तारखेला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार कारखान्यावर येऊन अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. त्याचा अहवाल काय आहे हे अद्याप स्पष्ट नसले तरी चौकशी झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून समजली आहे. दरम्यान कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही चौकशीला सामोर जाण्यासाठी तयार आहोत. साखर निर्यात ही नियमाप्रमाणे झाली आहे. सध्या कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे प्रशासकीय संचालक मंडळाने लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही उत्तर देऊ. या आरोपावर आम्ही पूर्वीच माध्यमांना खुलासा दिला होता. तो जुनाच विषय आहे.’