करमाळा (अशोक मुरूमकर) : अवघ्या तीन दिवसात नियोजन करून करमाळ्यात राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार अभयसिंग जगताप यांनी भव्य असा महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा- होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम घेतला. त्याला हजारो महिलांनी उपस्थितीत लावली. मात्र कार्यक्रम रंगात येताच वेळेच्या बंधनामुळे पोलिस प्रशासनाने कायक्रम बंद करण्याची सूचना केली. महिलांचा प्रतिसाद असतानाही आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनेचा आदर करत जगताप यांनी अक्षरशः आहे या स्थितीत म्हणजे रात्री १० वाजता कार्यक्रम बंद केला आणि काही वेळातच रविवारी म्हणजे (आज) पुन्हा हा कार्यक्रम होईल याची घोषणा त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे संतोष वारे व नलिनी जाधव उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून माणचे अभयसिंग जगताप यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. एकाच महिन्यात जगताप यांनी करमाळ्यात दुसरा कार्यक्रम घेतला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. वारे यांच्यासह प्रा. गोवर्धन चवरे, राजश्री कांबळे आदीजण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
करमाळ्यात शनिवारी मकरसंक्राती निमित्त क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साधारण सात हजार महिला उपस्थित होत्या. मोठ्या उत्सहात कार्यक्रम सुरु असताना हा कार्यक्रम वेळेच्या बंधनामुळे (रात्री १० वाजल्याने) निम्यातून बंद करावा लागला. निवेदक मळेगावकर व जगताप आणि वारे यांनी विनंती करूनही अर्धातास देखील वाढीव परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आहे असाच कार्यक्रम आज घेण्याचे जाहीर केले आहे.
‘महिलांचा सन्मान करणारे आम्ही आहोत. कायद्याचे पालन करणे ही आमचे नेते शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे आम्ही पालन केले. महिलांचा उत्साह पाहून त्याच दिमाखात हा कार्यक्रम आज होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे’, असे जगताप यांनी सांगितले आहे.