पंढरपूर : सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होवून पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या कार्यक्रमाला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि लक्ष्मणराव ढोबळे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार भरत गोगावले, समाधान आवताडे आणि शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधीतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके आणि लक्ष्मण आवारे यांचे सहकार्य लाभले.
या कॉफी टेबल बुकमध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन काळातील शिल्प कलेचा यादव कालिन अर्धनारी नटेश्वर, माचणूर, पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, हेमाडपंथी भगवंत मंदिर, वडवळचे नागनाथ मंदिर, दहिगाव येथील जैन मंदिर, अक्कलकोट मधील खाजा सैफुल मलिक दर्गाह, सोलापुरातील फस्ट चर्च आदि धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यासोबत प्राचीन वारसा असलेला सोलापूर येथील भुईकोट किल्ला, मंगळवेढा, माढा, माचणूर, करमाळा, पिलीव येथील भुईकोट किल्ला, अक्कलकोट येथील राजवाडा, चार हुतात्मा स्मारक, सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन, डॉ. कोटणीस स्मारक, वारकरी संप्रदायाची वारी परंपरा, महालिंगरायाची हुलजंती यात्रा, सिद्धरामेश्वराची गड्डा यात्रा, वडवळ नागनाथ यात्रा, उद्योग, कृषि पर्यटन केंद्र चिंचणी, कला व क्रीडा क्षेत्रातील सोलापूरचे योगदान, निसर्ग संपदा, जैवविविधता, सोलापूर शहराच्या मधोमध असलेले 200 हेक्टर क्षेत्रातील सिद्धेश्वर वनविहार, नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य यांचाही समावेश पुस्तकात आहे. याशिवाय या ठिकाणी आढळणारे विविध प्रकारचे शिकारी पक्षी, तृणभक्षक पक्षी, स्थलांतरीत होणारे पक्षी, फ्लेमिंगो (रोहित पक्षी), विविध सर्प प्रजाती, फुलपाखरे प्रजाती, विविध कोळी प्रजाती यांचाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.