करमाळा : वेताळ पेठ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दरवर्षीप्रमाणे जामा मस्जिद जमात ट्रस्टच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. करमाळा शहरात सर्वधर्म समभावचे हे प्रतिक असून पुष्पवृष्टी करण्याचे हे ३७ वे वर्ष आहे. ही पुष्पवृष्टी करण्याची तयारी मुस्लिम बांधवांनी केली केली होती. मानाचा पहिला गणपती मशीदीजवळ आल्याबरोभर ही पुष्पवृष्टी करण्यात आली.
सुभाष चौकात मुस्लिम बांधवांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीनिमीत्त प्रसाद वाटप करण्याता आला. अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने सुभाष चौक येथे श्रीदेवीचामाळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाच्या श्री गणेश मिरवणूकीचे स्वागत करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या हस्ते मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने, पोलिस उपनिरीक्षक माहुरकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ईद व अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने शेरणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तांबोळी म्हणाले, आज योगायोगाने दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने आम्ही आज सर्व हिंदू मुस्लिम बांधवाना प्रसाद वाटप करत हा सण साजरा करत आहोत. माजी नगरसेवक फारुक जमादार, हाजी फारुक बेग, वाजीद शेख, मजहर नालबंद, इमरान घोडके, साबीर तांबोळी, मोहसिन पठान, शाहरुख पठाण उपस्थित होते.