करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ओपन जीमचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून दिखाऊपणा केलेल्या ‘सायकल ट्रॅक’चे काय झाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वच्छ भारत अभियानामध्ये करमाळा नगरपालिकेने स्वच्छता सर्व्हेक्षणमध्ये सहभाग घेतला होता. याचा विसर सध्या नगरपालिका प्रशासनाला पडला आहे.
करमाळा शहरात माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप व तत्कालीन मुख्याधिकारी वीणा पवार यांच्या संकल्पनेतून करमाळा शहरात वेगवेगळे उपक्रम राबवले जात होते. करमाळा शहरात सात विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकावर रंगरंगोटीसह महत्वाच्या ठिकाणी स्वछ सर्वेक्षणाची जाहिरात करून नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले जात होते. त्यातच रंभापूरा भागात ओढ्याच्याकडेला व महात्मा गांधी विद्यालय, गायकवाड चौकापासून उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार केला होता. मात्र त्याचे आता काय झाले आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रंभापूरा भागातील ओढ्यावर असलेल्या सायकल ट्रॅकवर चिलारीची झाडे आली आहेत. त्यामुळे विद्रुपीकरण तर झालेच आहे. शिवाय स्वच्छताही नाही. यात लाखो रुपये खर्च झाले आहेत. प्रशासनालाही याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे.
माजी नगरसेवक प्रवीण जाधव म्हणाले, नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या असून त्याची सोडवणूक करण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असतात. गटार स्वच्छ केली जात नाही. समान दाबाने सर्वत्र पाणी मिळत नाही. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.